उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश पाटील यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल सात महिन्यांनंतर नवा कॅप्टन मिळाला आहे. मात्र, उमेश पाटील यांच्या नियुक्तीने सोलापूरच्या राष्ट्रवादीमध्ये वादळ उठण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दीपक साळुंखे यांनी (NCP) जिल्हाध्यक्षपदाचा, तसे पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. जिल्हाध्यक्षपदासाठी उमेश पाटील यांच्यासोबतच अनेक नावे चर्चेत होती. अनेकांनी जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे इच्छा बोलून दाखवली होती. अनेकांची इच्छा असूनही अजितदादांनी थेट नकार दिल्याने त्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली होती.